घोंगडी तयार कशी होते हे आपल्याला माहित आहे का?

घोंगडींना महाराष्ट्रात आध्यात्मिक-सांकृतिक वारसा आहे. धार्मिक सनासुदिंना घोंगडींवर बसण्याचा मान आहे आणि घोंगडी बसायला देणे गावांमध्ये प्रतिष्ठित समजले जाते. तर या घोंगड्या बनतात तरी कशा हे माहित करून घेणे हे अबालवृद्धांसाठी कुतूहलाचा विषय आहे. म्हणूनच घोंगडी तयार कशी होते हे माहित व्हावे म्हणून वाचकांसाठी हा खास ब्लॉग !

 

1. घोंगडी साठी लागणारी लोकर 

साधारणपणे दरवर्षी जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये मेंढ्यांची लोकर काढली जाते. लोकरीची रंगानुसार वर्गवारी केली जाते. पांढर्या, करड्या, तपकिरी आणि काळ्या रंगात लोकर मिळते. महाराष्ट्रामध्ये काळ्या रंगाची लोकर जास्तकरून घोंगडी साठी वापरली जाते. तसेच विविध रंगांच्या लोकरीच्या घोंगड्या देखील बनवल्या जातात. काळ्या रंगाच्या लोकरीपासून वर्षभर घोंगड्या तयार होतात तर पांढऱ्या शुभ्र रंगाची घोंगडी हि फक्त विशिष्ट कलाकारच तयार करतात, त्यामुळे पूर्ण पांढरी घोंगडी मिळवणे दुर्मिळ आहे. मेंढीच्या पहिल्या कात्रनीची लोकर जावळाची लोकर म्हणून ओळखली जाते. जमा झालेली लोकर पिंजून चरख्यावर कातण्यासाठी पाठवली जाते. लोकर कातण्याचे काम पुर्वम्पार महिला करत आलेल्या आहेत, दुपारच्या मोकळ्या वेळेत लोकर कातण्याचे काम होते. दुपारच्या शांततेत महिला एकत्र येवून लोकर काततात त्यांच्या चरख्याचा आवाज माळवदाच्या घरात सुरेल लय तयार करतो. या कातलेल्या लोकरीचे लांबसडक सुत तयार होते. 

 

2. लोकरीचे माप घेणे 

घोंगडी बनवण्यासाठी लागणाऱ्या लोकरीचे लाकडी मोजणी यंत्रावर माप घेतले जाते याला ताना काढणे असे म्हणतात. साधारणपणे ८ फुट, १० फुट आणि १२ फुट या लांबीच्या घोंगड्या बनवल्या जातात. ८ फुट घोंगडीला कोकणी पट्टी म्हटले जायचे परंतु काळाच्या ओघात कोकणी पट्टीची मागणी संपुष्टात आल्याने या लहान घोंगड्या आज सहसा बनवल्या जात नाहीत. ८ फुट घोंगडी बनवण्यासाठी ३५० यार्ड सुत लागते तर १० फुट आणि १२ फुट साठी अनुक्रमे ४०० आणि ४५० यार्ड सुत लागते. पुढे हि ताना काढलेली लोकर खळ लावण्यासाठी पाठवली जाते. 

 

3. चिंचोक्यांची खळ बनवणे 

घोंगडीला कधीही कीड लागू नये म्हणून घोंगडीला चिंचोक्यांची खळ लावली जाते. चिंचोक्यांना रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले जाते आणि नंतर सकाळी त्यांना मोठ्या उकळात कुटले जाते. साधारणपणे एक घोंगडी बनवण्यासाठी तीन ते साडे तीन किलो चिंचोके लागतात. प्रत्येक कलाकाराच्या घरात पिढीजात वापर होत आलेले उकळ आहे आणि मागील कित्येक पिढ्या ते वापरले जात आहे. खळ बनवण्यासाठी वाटलेल्या चीन्चोक्यांमध्ये हिराकस पावडर (Ferrous Sulphate) टाकतात. हे मिश्रण दीड ते दोन तास मोठ्या भांड्यांमधून शिजवले जाते. खळीमुळे लोकरीला बळकटी येते, कीड लागत नाही आणि वर्षोनुवर्षे टिकतात.  

 4. लोकरीला खळ लावणे 

घोंगडी बनवण्यासाठी माप घेतलेल्या लोकरीला बळकटी येण्यासाठी खळ लावली जाते. खळ लावण्यासाठी लोकर लाकडी सांगाड्यावर अंथरली जाते या सांगाड्यास घोडा म्हणतात. लाकडी ब्रशने हि खळ लोकरीला लावली जाते, खळ लावण्याची हि प्रक्रिया साधारणपणे अर्धा तास चालते आणि शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात पार पाडली जाते. त्यानंतर संपूर्ण दिवसभर सुत उन्हात वळविले जाते.

 5. लोकर मागावर लावणे 

मागावर सुत लावणे खळ लावून वाळवलेले सुत आता मागावर लावले जाते. घोंगडीचे माग हे खड्डा माग आहेत. जमिनीमध्ये दीड ते दोन फुट खड्डा खोदून कलाकार या खड्यामध्ये बसून हाताने घोंगडी विणतो. या मागावर लांबीनुसार सुत लावले जाते त्यास Warp म्हणतात तर रुंदिनुसार भरल्या जाणार्या सुताला Weft म्हणतात.

  6. घोंगडी विणणे 

लोकर मागावर लावल्यानंतर घोंगडी मागावर विणण्यासाठी घेतली जाते. घोंगडी विणताना घोंगडीच्या मध्य भागात काळी लोकर तसेच दोन्ही बाजूस ठरलेला पिवळा आणि लाल लोकरीचा दोरा लावला जातो. विणकर एक लय साधत विणायला सुरुवात करतो आणि अंदाजे आठ ते दहा तासात घोंगडी विणून पूर्ण करतो. घोंगडी विनाण्यापेक्षा पूर्वतयारीत कलाकारांचा बहुतांश वेळ जातो. पारंपारिक घोंगडी विणणाऱ्या कलाकारांना उत्पादन वाढविता यावे म्हणून Team Ghongadi.com घोंगडी बनविण्याच्या प्रक्रियामधे सुलभीकरण आणि आधुनिकीकरणांवर काम करणारा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ब्र्यांड आहे.

 

7. शेवटची खळ लावणे 

संपूर्ण घोंगडी विणून तयार झाल्यानंतर, घोंगडीला शेवटची खळ लावण्यात येते. कलाकारांच्या म्हणण्यानुसार हि खळ नैसर्गिकरीत्या घोंगडीला कीड लागण्यापासून वाचवते आणि लोकरीला मजबुती देते.

 

8. घोंगडी वाळवणे 

तयार झालेल्या घोंगडी ला खळ दिल्यानंतर कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळविले जाते. घोंगडी ला उन्हामध्ये वाळण्यासाठी टाकल्यामुळे नवीन घोंगडी मधील आर्दता निघून जाते आणि घोंगडी ला असलेला लोकरीचा नैसर्गिक वास निघून जातो.

9. घोंगडी ला रेवड (बॉर्डर) घालणे 

घोंगडी मधील लोकर सुटू नये म्हणून पारंपारिकरित्या घोंगडी ला रेवड घातली जाते. लाल-गुलाबी-पिवळा या रंगामधे रंगविलेल्या लोकरीपासून घोंगडीच्या दोन्ही बाजूला बॉर्डर घातली जाते यास रेवड मारणे म्हणतात. जागरण-गोंधळ तसेच विविध धार्मिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या घोंगड्या ह्या रेवड मारलेल्या वापरणे मानाचे समजले जाते. आजमितीस सोलापूर जिल्ह्यामध्ये हातावर मोजण्याइतपत कलाकारांची घरे राहिलेली आहेत जी पारंपारिक पद्धतीने हाताने रेवड घालतात.

10. तयार घोंगडीचे गुणवत्ता परीक्षण 

तयार झालेल्या घोंगड्या या सर्व कलाकारांकडून आमचे कलाकार प्रतिनिधी एकत्र गोळा करतात. या सर्व घोंगडी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात. ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक घोंगडी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून कटाक्षाने तपासली जाते. घोंगडी ची लांबी-रुंदी, वापरलेल्या लोकरीच्या गुणवत्ता, घट्ट वीण इत्यादी बाबींची तपासणी केली जाते. या घोंगड्या गावांमधून Ghongadi.com च्या पुणे ऑफिस ला येतात आणि तेथून ग्राहकांकडे घरपोच पाठविल्या जातात.

 

 

 

7 comments

Dada Aiwale

I want orange colour ghongadi

jitendra marathe

I want orange ghongadi

Leave a comment

Please note, comments must be approved before they are published