घोंगडी ची गोष्ट

‘काठी नं घोंगडी घेवूद्या कि रं अन मला बी जत्रला येवूद्या कि’ हे शाहीर निवृत्ती पवार यांचे लोकगीत असो कि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे’ हा अभंग, महाराष्ट्रातील आबालवृद्ध जाणून असलेली घोंगडी आजदेखील महाराष्ट्रातील गावांमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील गावांमध्ये बोटांवर मोजता येतील इतके कमी धनगर कलाकार घोंगडी विणण्याची पारंपारिक कला टिकवून आहेत. या गावांमध्ये विखरून राहत असलेल्या कलाकारांना शोधणे आणि त्यांच्याकडून अस्सल खड्डा मागावरील धनगरी घोंगडी तयार करणे, घोंगडी बनवण्याच्या कलेचा इत्यंभूत अभ्यास करणे आणि घोंगडी पुढच्या पिढींना देखील पाहायला मिळावी यासाठी या कलेचे जतन करणे हे उदिष्ट ठेवून हा प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

 

घोंगडी चे ऐतिहासिक संदर्भ 

भक्ती संप्रदायामध्ये घोंगडी ला अनन्यसाधारण असे महत्व आहे. श्री ज्ञानेश्वरी चे पठण असो किंवा संत तुकारामांच्या गाथेचे पारायण, पारंपरिक पध्दतीने घोंगडी वर बसून ग्रंथांचे वाचन केले जाते. जागरण-गोंधळ आणि विविध धार्मिक सण-उत्सवांमध्ये घोंगडी चा मान आहे. ग्रामीण भागांत लग्न ठरवण्याच्या बैठकींना, विविध सोहळ्यांमध्ये तसेच घरी पाहुणे आल्यानंतर बसण्यासाठी घोंगडी टाकणे आजदेखील प्रतिष्टीत समजले जाते. कोकणामध्ये भातशेती लागवडीसाठी पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून घोंगडी डोक्यावर घेतली जात असे.

शेतकरी वर्गामध्ये घोंगडी चा उपयोग हा पिढ्यानपिढ्या होत आलेला आहे, जुन्या घोंगडी 12 फुट लांब असल्याने अंथरून आणि पांघरून म्हणून एकच घोंगडी वापरली जात असे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांना प्रत्येकी 2 घोंगडी देत असत असा इतिहासकालीन संदर्भ आहे. महात्मा फुले हे नेहमी खांद्यावर घोंगडी घेत असत.

 

धनगरी बाज - लोकसंस्कृती  

धनगर समाजातील जुनी जाणती मानसं घोंगडीला असलेल्या धशा मोजून भविष्य वर्तवत असत, यावर्षी पाऊस होईल का? भरभराट होईल का? इत्यादी माहिती ते देवाकडून सांगणे आहे म्हणून घोंगडी द्वारे सांगत. मल्हारी च्या खांद्यावर असलेली घोंगडी समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतिक म्हणून आजदेखील पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक मराठी घरात ठेवणीत असते.

सुंबरान म्हणजे स्मरण. प्रामुख्याने जेजुरीचा खंडोबा, विडणीचा धुळोबा, आरेवाडीचा बिरोबा या देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी मौखिक ओव्या मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी (जमीन), नद्या, मेघ (ढग) यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल व झांजांच्या तालावर, ठेक्‍यात व ठसक्‍यात या ओव्या गायल्या जातात. या ओव्या गाऊन किंवा कथेच्या रुपात मांडल्या जातात. गावांमध्ये सगळे आबालवृद्ध एकत्र जमून घोंगडी वर बसून या लोकसंगीताचा आनंद घेतात. हे स्मरण सुंबरान म्हणून मांडले जाते.

धोतर, पटका, मेंढरं आणि हातात घोंगडी घेऊन दरमजल करणाऱ्या धनगर बांधवांच्या सभोवतालात घोंगडी चं असणं अविभाज्य आहे. खड्डामागावर घोंगडी विणण्याची कला हि सर्वार्थाने मराठी मातीतील लोककला आहे आणि तिला असणारा रांगडा धनगरी बाज महाराष्ट्रातील घराघरात आज घोंगडी.कॉम च्या माध्यमातून पोहोचतो आहे. या लोककलांवर विसंबून असणाऱ्या, मातीशी नाळ जुळवून असणाऱ्या कलाकारांसाठी आज हक्काचे माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत.

 

 

आज घोंगडी.कॉम बरोबर सलग्न असलेल्या कलाकारांचे सरासरी वय हे 60 वर्ष आहे. तसेच सर्वात अनुभवी असलेले कलाकार 80 वर्षांचे आहेत. घोंगडी बनवायला लागणाऱ्या भरपूर वेळेमुळे आणि त्या परीश्रमांच्या तुलनेत अगदीच किरकोळ मिळणाऱ्या नफ्या मुळे महाराष्ट्रभर विखुरलेल्या घोंगडी बनवणार्या कलाकारांनी मागील 20 वर्षांत घोंगडी विणणे थांबवले आणि अर्थार्जनाचे वेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. आज घोंगडी.कॉम बरोबर जोडले गेलेले सर्वात तरुण कलाकार हे चाळीशीतील आहेत. मूळ पद्धतीने घोंगड्या बनवणाऱ्या कलाकारांची संख्या आजमितीस बोटांवर मोजण्या इतपत कमी झाली आहे. परंतु घोंगडी.कॉम च्या टीम ने सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून 40 कलाकारांना घोंगडी.कॉम उपक्रमासोबत आतापर्यंत जोडले आहे.   

घोंगडी विणण्यासाठी आमचे कलाकार वापरत असलेले खड्डा माग देखील पूर्णपणे पारंपारिक आहेत. बहुतेक माग हे चाळीस वर्षांपर्यंत जुने आहेत. साधारणपणे घराच्या पुढच्या जागेत अंदाजे दीड मीटर उंचीचा खुंटा जमिनीत रोवलेला असतो तर या खुंट्यापासून बारा फुटांवर अडीच ते तीन फुटांचा खड्डा खोदून त्यामध्ये कलाकार बसून घोंगडी विणतो. खड्डा मागावर विणलेल्या घोंगडी ची वीण हि अत्यंत जवळ आणि मजबूत असते, आणि अशा पारंपारिक पध्ततीने तयार केलेल्या घोंगड्या किमान पंचवीस ते तीस वर्ष टिकतात.     

 

 उपक्रम आणि उद्देश

 

घोंगडी.कॉम हे ‘सामाजिक बांधिलकीतून शाश्वत आर्थिक विकास’  (For profit, impact oriented social startup for sustainable development) या तत्वावर सुरु करण्यात आलेला उपक्रम आहे. ग्राहकाला, ग्राहकाच्या बदलत्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून प्रोडक्ट आणि सेवा पुरविणे हा घोंगडी.कॉम चा उद्देश आहे. सर्वोत्तम प्रोडक्ट क्वालिटी आणि मिळणाऱ्या नफ्यातील मोठा वाटा हा आमच्या कलाकारांना मिळेल यावर आम्ही कटाक्षाने लक्ष ठेवून काम करतो. उच्च प्रतीची लोकर उत्पादन निर्मिती साठी आम्ही वापरतो, तसेच भारतातील विविध भागांतील लोकरीचे नमुने गोळा करून त्यावर घोंगडी निर्मितीसाठी लागणारे अभिनव प्रयोग आम्ही पुणे शहरात करतो. समाधानी ग्राहक हीच व्यवसायाची गुरुकिल्ली आहे याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे.

 

घोंगडी निर्मितीतील विविध घटकांचा अभ्यास आणि घोंगडी बनविण्याच्या पद्धती मधील सुलभीकरण यावर आम्ही अविरत प्रयोग करत आहोत. धनगर समाजातील जुन्या-जाणत्या कलाकारांना सोबत घेवून विस्मृतीत गेलेल्या घोंगडी डिझाईन पुन्हा नव्याने तयार करून हौशी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील समांतर पातळीवर आम्ही चालू ठेवलेले आहेत. आणि या प्रयत्नांचे फळ म्हणून आपण आमच्या नुकत्याच प्रदर्शित केलेल्या सुंबरान आणि मल्हार या घोंगडी पाहू शकता. धनगर समाजातील लिखित तसेच मौखिक साहित्यातून घोंगडी संदर्भात विविध साहित्य गोळा करण्याचे आणि डिजिटल लायब्ररी च्या स्वरुपात प्रदर्शित करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काम करत आहोत.

 

 

आजमितीस घोंगडी.कॉम बरोबर सलग्न असलेले कलाकार हे प्रामुख्याने साठीच्या वयातील आहेत. तरुण पिढीतील कलाकारांना प्रवाहात आणून त्यांना घोंगडी निर्मितीतून आर्थिकदृष्ट्या सबळ करणे हे आमचे प्रमुख उदिष्ट आहे. कारण नवी कलाकारांची पिढी खड्डा-मागावरील घोंगडी निर्मितीत आली नाही तर संपूर्ण घोंगडी बनविण्याची कलाच नामशेष होण्याची शक्यता आहे. तसेच पारंपारिक घोंगडी निर्मितीतील पद्धतिंवर संशोधन करत खड्डा मागाचे सुलभीकरण करण्यावर आमचा भर आहे.